कुंभमेळ्यातून युवकांना रोजगार, पत्रकारांना मानधन द्या – शेरा खान
प्रेस परिषदेची शासनाकडे मागणी
नाशिक : राज्यात सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांपुढे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. अनेक सुशिक्षित युवकांच्या नोकऱ्या गेल्याने रोजगाराचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. अशा परिस्थितीत नाशिक येथे होऊ घातलेला कुंभमेळा हा रोजगारनिर्मितीची मोठी संधी ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी प्रेस परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शेरा खान यांनी केली आहे.

यासोबतच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार सातत्याने कार्यरत असतात. त्यामुळे कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यात कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी शासनाने विशेष मानधनाची तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार, तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि पत्रकारांच्या कार्याचा सन्मान या तिन्ही बाबी साध्य होऊ शकतात, असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
राज्य सरकारने युवकांच्या भवितव्याचा विचार करून कुंभमेळ्याला रोजगाराच्या दृष्टीने संधीमध्ये रूपांतरित करावे, तसेच पत्रकारांच्या योगदानाची दखल घेत त्यांना योग्य मानधन देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रेस परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शेरा खान यांनी व्यक्त केले आहे.



